खरं तर विवाह संस्कार विधींची निर्मिती द्रष्ट्या ऋषीमुनींनी मानवांच्या नैसर्गिक भावनेला ‘योग्य’ वाट मिळावी, पुढील पिढी, समाज सुदृढ, सुसंस्कारित व्हावीत म्हणून केली. पण आजच्या काळात हौसमौज या नावाखाली जे काही विवाह समारंभात चालतं ते पाहून त्यांना पश्चात्ताप होत असेल.
माझ्या लहानपणी बहुतांश विवाह कुणाच्या तरी घरात किंवा शाळेत वगैरे होत. कार्यालयं वगैरे कमी होती. हळद चढविण्याव्यतिरिकक्त शृंगार केला जात नव्हता. छायाचित्रण, चलचित्रणही फारसं केलं जात नसे. त्यामुळे विधींना पुरेसा वेळ देऊनही विवाह समारंभ लवकर आटपायचा.
आता विवाह एकदाच होतो या सबबीखाली जे काही होतं त्यावर खरं तर चारचौघात बोलायची सोय नाही(म्हणून मला समाज माध्यमांचा आधार घ्यावा लागत आहे).
शृंगार करुच नये असं माझं मत नाही. पण अलीकडे ब्रायडल मेकअप अशा काही नावांचा(मला इंग्रजीचा गंधही नाही.) भयानक प्रकार केला जातो तो पहावत नाही. त्यात कसली-कसली घाण रसायनं वापरतात ‘निर्मातेच’ जाणतात. मुखं इतकी विचित्र दिसतात की चलचित्र मालिकेतील राक्षसी देखील बऱ्या दिसतात.
हे झालं मेकअप नावाच्या प्रकाराबद्दल! छायाचित्रणाबद्दल काय बोलणार! लहान-लहान कार्टी देखील भ्रमणभाष/चतुरभाष संच घेऊन छायाचित्रण/चलचित्रण करण्यासाठी धावत असतात. तिथं विधी, लग्न लावणारे गुरुजी दुय्यम ठरतात. हे सगळं बघितलं की वाटतं विवाह(?) हे भारतीय संस्कृती, येणारी पिढी(आणि वधू-वरांसाठीही) विषारी बनत आहेत.
No comments:
Post a Comment